
वणी (प्रतिनिधी) : वणी शहरातील प्रभाग क्रमांक ५, दामले फैल परिसरातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था, तुंबलेली गटारे, शौचालय ते शिवमंदिर रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे-झुडपे आणि साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दि. १७ ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या दिवशी शिवमंदिरात पूजनासाठी सकाळपासून भाविकांची वर्दळ होती. मात्र मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अस्वच्छता व दुर्गंधी असल्याने भाविकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या दरम्यान नगर परिषदेकडून सफाई कर्मचारी परिसरात आले आणि रस्त्याची साफसफाई करण्यास सुरुवात केली. मात्र रस्त्याच्या अनेक भागात उघड्यावर शौच झाल्याने सफाई कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. वारंवार त्याच ठिकाणी अस्वच्छता निर्माण होत असल्याने केवळ झाडू मारून ही समस्या सुटणार नसल्याचे चित्र दिसून आले.
दररोज याच ठिकाणी घाण होत असल्याने नियमित स्वच्छता, कचरा संकलन आणि वापरण्यायोग्य सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या परिस्थितीची माहिती माजी नगराध्यक्षा सुरेश रायपुरे यांनी दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे सभापती चिंडालिया यांना दूरध्वनीद्वारे दिली. त्यानंतर सभापतींनी तातडीने पाण्याचा टँकर पाठवून रस्त्याची साफसफाई करून घेतली.
मात्र नागरिकांचा सवाल आहे की, तात्पुरती साफसफाई किती दिवस? सार्वजनिक शौचालयाची कायमस्वरूपी दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम कधी होणार?
सार्वजनिक शौचालयाची अनेक वर्षांपासून दुरवस्था
दामले फैल येथील सार्वजनिक शौचालय अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. परिसरातील काही नागरिकांच्या घरी शौचालयाची सुविधा नसल्याने त्यांना सार्वजनिक शौचालयाची आवश्यकता असते. मात्र सार्वजनिक शौचालय वापरण्यायोग्य स्थितीत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येते.
यामुळे परिसरात उघड्यावर शौच करण्याची समस्या निर्माण होत असून रस्त्याच्या कडेला अस्वच्छता व दुर्गंधी पसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे केवळ अधूनमधून साफसफाई करण्याऐवजी सार्वजनिक शौचालयाची कायमस्वरूपी व्यवस्था करणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न
शिवमंदिराकडे जाणाऱ्या याच मार्गावरून नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ९ तसेच सक्षम शाळेतील अनेक विद्यार्थी दररोज ये-जा करतात. तुंबलेल्या गटाऱ्यांमुळे साचलेले पाणी, कचरा, दुर्गंधी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्यापासून काही गटारे तुंबलेली असल्याने त्यातील घाण बाहेर वाहत असल्याचे नागरिक सांगतात. शौचालय परिसरात पुरेशा कचरा कुंड्या नसल्याने काही ठिकाणी कचरा साचत असल्याचेही निदर्शनास येते.
दररोज कचरा गाडी येते; तरीही अस्वच्छता का?
नगर परिषदेची कचरा संकलन गाडी प्रभागात नियमित येत असल्याचे नागरिक सांगतात. मात्र काही नागरिक कचरा गाडीत न टाकता शौचालय परिसरात किंवा रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असल्याने अस्वच्छता निर्माण होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे नागरिकांनीही कचरा निर्धारित ठिकाणीच टाकणे आवश्यक असून, नगर परिषद प्रशासनाने कचरा कुंड्या, नियमित स्वच्छता आणि जनजागृती यावर भर देण्याची गरज आहे.
मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी
दामले फैल परिसरातील सार्वजनिक शौचालय, पिण्याचे पाणी, बोअरवेल, वार्डातील पाणीटंचाई तसेच नागरिकांना परवडणाऱ्या दरात नवीन नळ कनेक्शन उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रश्न अद्याप कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सन २०१६ ते २०२५ या कालावधीत परिसरातील काही मूलभूत समस्या अपेक्षित पद्धतीने मार्गी लागल्या नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या कालावधीतील विकासकामे, त्यासाठी उपलब्ध झालेला निधी आणि प्रत्यक्ष करण्यात आलेली कामे याबाबत नगर परिषद प्रशासनाने पारदर्शक माहिती नागरिकांसमोर ठेवावी, अशी मागणी होत आहे.
मंजूर सार्वजनिक शौचालय नेमके कुठे?
दामले फैल येथे नवीन सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम मंजूर असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली होती, असा नागरिकांचा दावा आहे.
विशेषतः सन २०२३-२४ मध्ये नगर परिषदेत प्रशासकीय कारभार सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दामले फैल येथील सार्वजनिक शौचालयाच्या नवीन बांधकामाला मंजुरी मिळाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
जर या कामाला अधिकृत मंजुरी मिळाली असेल, तर त्याचा मंजुरी आदेश, निधी, अंदाजपत्रक, कामाचे ठिकाण, कार्यादेश आणि काम सुरू करण्याची नियोजित तारीख नगर परिषद प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मंजुरी मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसेल, तर त्यामागील कारण काय, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे. प्रत्यक्ष बांधकाम कधी सुरू होणार आणि नागरिकांना सार्वजनिक शौचालयाची सुविधा कधी मिळणार? हा प्रश्न सध्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज
शिवमंदिर रस्ता, शाळा आणि नागरिकांची नियमित वर्दळ असलेल्या परिसराची नगर परिषद प्रशासनाने तातडीने पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.
यामध्ये तुंबलेली गटारे साफ करणे, सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम करणे, कचरा कुंड्यांची व्यवस्था करणे, वाढलेली झाडे-झुडपे हटविणे आणि आवश्यक ठिकाणी स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध करून देणे या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही कोणी उघड्यावर शौच करताना किंवा रस्त्यावर कचरा टाकताना आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
हागणदारीमुक्तीसाठी केवळ आवाहन करून चालणार नाही. सार्वजनिक शौचालयाची सुविधा, नियमित स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई या सर्व बाबींवर नगर परिषद प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
नागरिकांना तात्पुरत्या साफसफाईपेक्षा कायमस्वरूपी सुविधा आणि प्रत्यक्ष विकासकामांची अपेक्षा असून, नगर परिषद प्रशासनाने दामले फैलमधील या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

