
वणी (प्रतिनिधी) | दि. १३ ऑगस्ट : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आणि “हर घर तिरंगा” मोहिमेअंतर्गत वणी शहरात देशभक्त नागरिकांच्या वतीने गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला वणीकर नागरिकांसह शहरातील विविध शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे २५०० नागरिकांनी रॅलीत सहभाग नोंदवत देशभक्तीचा उत्साह व्यक्त केला.
वणी शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षकवृंद, सामाजिक व धार्मिक संस्था, सांस्कृतिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, निवृत्त सैनिक, विविध बचत गटांच्या महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात तिरंगा ध्वज घेत देशभक्तीपर घोषणांनी शहरातील वातावरण देशभक्तिमय झाले. विशेष म्हणजे युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग हे रॅलीचे आकर्षण ठरले.

रॅलीची सुरुवात विश्रामगृह, वणी येथून झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाती चौक, महात्मा गांधी चौक, संत गाडगे बाबा चौक, शहीद भगतसिंग चौक, सर्वोदय चौक, रविंद्रनाथ टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि लोकमान्य टिळक चौक या प्रमुख मार्गांवरून रॅली मार्गक्रमण करीत पार पडली.
रॅलीदरम्यान विविध सामाजिक संघटना, जैन समाजाची श्री महावीर बहुउद्देशीय सेवा संस्था, वणी, सिंधी समाज संघटना, स्नेहा डेअरी, अंकुश मोबाईल शॉपी तसेच विविध व्यापारी बांधवांनी ठिकठिकाणी नागरिकांसाठी पाणी व बिस्कीटचे वाटप केले. नागरिकांनीही रॅलीवर पुष्पवृष्टी करून सहभागींचे स्वागत केले.
रॅलीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे सहभागी झाले. यामुळे राष्ट्रीय एकता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.

रॅलीदरम्यान वणी पोलीस व वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली. पोलिसांनीही रॅलीत सहभाग नोंदविला. नगर परिषद वणीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी रॅलीच्या मार्गावर स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली. रॅली पुढे जात असताना मागील मार्गाची तत्काळ स्वच्छता केली जात असल्याने नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध आयोजनाचे विशेष कौतुक झाले.
रॅलीनंतर आयोजकांच्या वतीने विश्रामगृह, वणी येथे सर्व सहभागी नागरिकांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.
या ऐतिहासिक आणि देशभक्तीपर उपक्रमाला वणीकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आयोजकांनी सर्व शाळा-महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक व सांस्कृतिक संस्था, निवृत्त सैनिक, ज्येष्ठ नागरिक, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस, पत्रकार बांधव तसेच सहभागी नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
“तिरंगा आहे अभिमान, ठेवू त्याचा सदैव मान” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीमुळे वणी शहरात देशभक्तीची लहर निर्माण झाली.
