भाग – २ : वृक्षतोड, लेआउट आणि वाढते काँक्रीटीकरण; नागरिकांकडून पर्यावरणीय नियोजनाचा प्रश्न..

वणी (प्रतिनिधी): वणी शहरातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या पहिल्या भागानंतर नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. शहरातील विकासकामे, रस्त्यांचे रुंदीकरण, नव्या लेआउटचा विस्तार आणि कमी होत चाललेली वृक्षसंख्या याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, सन २०१७ ते २०२१ या कालावधीत संबंधित विभागामार्फत शहरातील विविध शासकीय मोकळ्या जागांवर वृक्षारोपण करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र किती रोपे लावली गेली, त्यापैकी किती झाडे आजही जिवंत आहेत, किती रोपे नष्ट झाली आणि त्यांची देखभाल कशी करण्यात आली, याबाबतची माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत आहे. या कामांवर खर्च झालेल्या सार्वजनिक निधीचा अपेक्षित परिणाम झाला का, याचीही वस्तुनिष्ठ पडताळणी व्हावी, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
गेल्या काही वर्षांत वणी–चिखलगाव–यवतमाळ मुख्य मार्गासह शहरातील विविध भागांत रस्ते रुंदीकरण आणि इतर विकासकामांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर सावली देणाऱ्या वृक्षांची तोड झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र त्या बदल्यात पुरेशा प्रमाणात वृक्षारोपण, झाडांचे संगोपन आणि संवर्धन झाल्याचे दिसून येत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
दि. १७ जुलै रोजी शहरातील काही रस्ते कंत्राटदार, काही राजकीय व्यक्तींशी संबंधित तसेच काही लेआउट विकासकांचे शुभेच्छापर बॅनर शहरात झळकल्यानंतर नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. काही नागरिकांच्या मते, मोट्या वेक्तीचा गौरव होत असताना त्याच विकासकामांचा पर्यावरणावर झालेल्या परिणामांचाही वस्तुनिष्ठ आढावा घेणे आवश्यक आहे.
सध्या शहरात वाढत्या तापमानाची तीव्रता नागरिकांना जाणवत असून, पावसाळ्यातही उकाड्याची स्थिती कायम असल्याचे चित्र आहे. रस्ते मोठे रुंद झाले, वाहतुकीच्या सुविधा वाढल्या; मात्र त्या रस्त्यांवर पूर्वीप्रमाणे सावली देणारी झाडे उरली नसल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करीत आहेत.
मुख्य रस्त्यांवरील दुभाजकांमध्ये शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. मात्र वणी बसस्थानकासमोरील दुभाजकात सध्या अत्यल्प शोभेची झाडेच जिवंत असल्याचे नागरिकांचे निरीक्षण आहे. उर्वरित झाडांचे संवर्धन का झाले नाही, याबाबत संबंधित विभागाने माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच, शोभेच्या झाडांबरोबरच दीर्घकाळ सावली देणाऱ्या वृक्षांनाही प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे. परिणामी उन्हाळ्यात प्रवासी, फेरीवाले, हातगाडी व्यावसायिक आणि ऑटोचालकांना नैसर्गिक सावलीचा आधार कमी झाल्याचे दिसून येते.
विशेषतः प्रभाग क्रमांक ५ मधील दामले फैल, दामले लेआउट आणि नदीकाठ परिसरात पूर्वी सागवान-बांबूवन येथील कडुनिंब, आंबा, चिकू, पिंपळ आदी विविध प्रजातींची मोठी झाडे असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. कालांतराने या परिसरात लेआउट आणि निवासी बांधकामे उभी केल्या गेली. या विकासकामांनंतर पर्यावरणीय भरपाई म्हणून आवश्यक प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन झाल्याचे दिसत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.
शहराच्या अवतीभवती नव्याने विकसित होत असलेल्या लेआउटमध्ये पर्यावरणपूरक नियोजन, खुल्या जागांचे संरक्षण आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण यांना प्राधान्य देण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. तसेच विकासकामांना मंजुरी देताना पर्यावरणीय अटींचे पालन झाले का, वृक्षलागवडीच्या अटींची अंमलबजावणी झाली का आणि लावलेली झाडे प्रत्यक्षात जिवंत आहेत का, याची नियमित पडताळणी संबंधित विभागांनी करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, शहराचा विकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. रस्ते, इमारती आणि लेआउट यांच्यासोबतच सावली देणाऱ्या वृक्षांचे संरक्षण, नवीन वृक्षलागवड, तलावांचे संवर्धन आणि पावसाच्या पाण्याचे नियोजन यांना समान महत्त्व दिल्यास भविष्यात वाढत्या उष्णतेवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे शक्य होईल.
