
वणी (प्रतिनिधी): भारत सरकार वस्त्र उद्योग मंत्रालय विकास आयुक्त (हस्तकला) नागपूर व शिवकृपा बहुउद्देशीय संस्था उकणी वणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ ते २० ऑगस्ट २०२५ दरम्यान राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय, वणी येथे आयोजित तीन दिवसीय हस्तकला कार्यशाळेचा समारोप सोहळा वणी पब्लिक स्कूलच्या सभागृहात उत्साहात पार पडला.
या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षपद संजय खाडे, अध्यक्ष शिवकृपा बहुउद्देशीय संस्था उकणी वणी यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून अभय पारखी (मुख्याध्यापक, राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय, वणी) व राकेश देशपांडे (प्रिन्सिपल, वणी पब्लिक स्कूल, वणी) उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत तयार केलेल्या हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन पाहून सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना संजय खाडे यांनी हस्तकला क्षेत्रातील संधींबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातून स्वतःचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले.
प्रमुख अतिथी अभय पारखी व राकेश देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून आशिष पाटील, गणू रावत, अनिल वाघमारे व प्रमोद देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोडके सर (सहाय्यक शिक्षक, राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय) यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजानन अलोने (CEO, शिवकृपा बहुउद्देशीय संस्था उकणी वणी) यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय शेंडे, विनीत तोडकर तसेच शाळेतील शिक्षक व १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग लाभला.